सांगोला विधानसभा मतदारसंघात मुसळधार पावसाचा तडाखा ; ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन.
माणदेश मैदान न्युज :-
( कोळे / वाहिद आतार)
सांगोला तालुका व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सत्र सुरू असून, त्यामुळे शेतकरी, गावकरी व प्रशासन चिंता व्यक्त करत आहेत. मौजे कोळे, कराडवाडी, कोंबडवाडी तसेच आसपासच्या पंचक्रोशीतील गावांमध्ये पावसाचे मोठे प्रमाण सुरू असल्याने ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सूचित केले आहे की, जोरदार पावसात घराबाहेर न पडता लहान मुलांना सुरक्षित ठेवावे, ओढे-नाल्याजवळ जाणे टाळावे, जुन्या व पडझड झालेल्या घरांबाबत खबरदारी घ्यावी. तसेच विजेच्या खांबांना स्पर्श करू नये, जनावरे विजेच्या खांबाजवळ बांधू नयेत अशी विशेष सूचना देण्यात आली आहे.कोणतीही अनुचित घटना घडल्यास ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी व संबंधित विभागांना त्वरित माहिती द्यावी असेही आवाहन करण्यात आले.
बुद्धीहाळ जलसिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी गौडवाडी, बुद्धीहाळ,उदनवाडी, पाचेगाव, हातीद, चोपडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनावश्यक प्रवास टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील हवामान खात्याच्या अंदाजानुसार २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (SEOC) सर्व जिल्हा प्रशासनांना पूर्वतयारीचे आदेश दिले आहेत.२८ सप्टेंबर रोजी विशेषतः काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी बळीराजा या अस्मानी संकटामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे.याच पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या दुःखात सामील होत प्रशासनाला तातडीने मदतीचे आदेश दिले असून, मुख्यमंत्री व पालकमंत्री महोदयांकडे मदतकार्य सुरू करण्याचे निवेदन सादर केले आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments