प्रत्येक मतदाराची नोंद मतदार यादीत झाल्याची खात्री करा - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
सांगली प्रतिनिधी / (जि. मा. का.) : मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोग कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्या मतदाराची नोंद मतदार यादीमध्ये झाली आहे का ? याची खात्री करावी. त्याचबरोबर मतदान केंद्र बदलाबाबतची माहिती सामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यावी, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी आज सांगलीला भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पुणे विभाग उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा उंटवाल-लड्डा, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, प्रांताधिकारी सर्वश्री श्रीनिवास अर्जुन, विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, एकही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये यासाठी निवडणूक आयोग तसेच जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर 18 वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदारांची नोंदणी करून घ्यावी. मतदार यादीमध्ये नाव चुकले असल्यास किंवा नोंदणी करणे बाकी असल्यास अथवा नावे वगळली गेली असल्यास सर्व संबंधित मतदारांची खात्री करून तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या निवडणुकीचे कामकाज वेळेत व अचूकरित्या पार पाडावे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. निवडणुका नि:पक्षपणे पार पडतील यासाठी प्रशासनाने काम करावे. या कामात कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नये अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आयुक्तांना जिल्ह्यातील मतदार केंद्रे तसेच पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी तहसीलदार श्रीमती डॉ. अपर्णा मोरे - धुमाळ, अर्चना कापसे, मीना बाबर, दीप्ती रेटे, शामला खोत, अश्विनी वरुटे तर सर्वश्री तहसीलदार अजित शेलार, सचिन पाटील, सागर ढवळे, उदय गायकवाड तर अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

!doctype>
Post a Comment
0 Comments