कारगाडी मध्ये बसवून सोडण्याच्या बहाना करून सोन्यांची लूट , सांगोला पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीचा नावे गुन्हा दाखल.
माणदेश मैदान न्युज (संपादक बबन चव्हाण):-लोटेवाडीला जायचे आहे, रस्ता कोठून जातो असे म्हणून महिलेला कारमधून लिफ्ट दिली. काही अंतरावर गेल्यावर कारमधील असलेल्या महिलेने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व बोरमाळ असे सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. ही घटना बुधवारी भर दुपारी एकच्या सुमारास महूद ते लक्ष्मीनगर (ता. सांगोला) जाणाऱ्या रस्त्यावर घडली आहे. सुनंदा लक्ष्मण गोडसे (वय ५५, रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला) या बुधवारी अकराच्या सुमारास महूद येथे सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आल्या होत्या.
दुपारी एकच्या सुमारास त्या दवाखान्यात उपचार घेऊन लक्ष्मीनगरकडे घरी जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत थांबल्या होत्या. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास एक कार सुनंदा गोडसे यांच्या जवळ येऊन थांबली. त्यात कारमधील महिलेने आम्हास लोटेवाडीला जायचे आहे. रस्ता कोठून जातो असे विचारले असता सुनंदा गोडसे यांनी जाण्याचा मार्ग सांगितला. त्यावेळी कारमधील महिलेने तुम्ही कुठे निघाला आहात. तुम्हाला वाटेत कारमधून सोडू का असे विचारल्यावर महिला कारमध्ये बसली, व कार लक्ष्मीनगरच्या दिशेने जाऊ लागली. दरम्यान, कार काही अंतरावर गेल्यावर कारमधील सुनंदा गोडसे यांच्या शेजारी बसलेल्या महिलेने गळ्यातील सोन्याचे दागिने काढून दे असे धमकावले असता सुरुवातीला सुनंदा गोडसे यांनी नकार दिला. परंतु कारमधील महिलेने कारचालकास तो चाकू आण रे इकडे असे म्हणाली असता घाबरून सुनंदा गोडसे यांनी गळ्यातील गंठण व बोरमाळ असे सुमारे दीड तोळ्याचे दागिने काढून दिले व चालत्या कारमधून बाहेर उडी मारली व आपला जीव वाचवल्याची घटना घडली आहे. याबाबत सुनंदा गोडसे यांनी अज्ञात कारमधील महिला व कार चालकाविरुद्ध जबरदस्तीने गळ्यातील दागिने काढून घेतले व जीवे ठार मरण्याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल ढेरे व पोलिस कॉन्स्टेबल भानवसे हे करीत आहेत.

!doctype>
Post a Comment
0 Comments