*अलमट्टीतून ३ लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी विसर्ग व्हावा-पालकमंत्री हसन मुश्रीफ*
(कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी) / अलमट्टीतून ३ लाख क्युसेक पाणी सायंकाळपासून सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीवेळी सांगितले. जिल्ह्यात अजून दीड महिना पावसाळा असतो हा विचार करुन नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांच्यासमवेत जिल्हा प्रशासनाचा ऑनलाईन स्वरुपात पुरस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पाणीपातळी, धरणसाठा, स्थलांतरीत संख्या तसेच राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली. बैठकीत खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ३ लाख क्युसेक पेक्षा जास्त पाणी विसर्ग अलमट्टीतून व्हावा, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. तसेच जिल्हयात ज्या ठिकाणी ६५मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अशा ठिकाणी तातडीने पंचनामे करा. सर्व तालुक्यातील ग्रामसेवक, तलाठी यांच्यापासून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी अलर्ट मोडवर राहून कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. घरांची पडझड, इतर नुकसान तसेच शेतीचे नुकसान याबाबत पंचनामे त्या त्या वेळी करणे सुरु असून एका महिन्यात भरपाई देण्याचे नियोजनही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी सांगितले. सध्या पंचगंगा व इतर नद्याही धोका पातळीवर वाहत आहेत. दिवसापेक्षा रात्रीचा पाऊस धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामूळे नदीकाठची गावे आणि विशेषत: कोल्हापूर महानगरपालिकेने जास्त सतर्कता बाळगावी, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. जिल्हयातील खासदार व आमदार यांनी आपापल्या भागातील गावांमधे पुरस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती व येणाऱ्या अडचणी प्रशासनाला सांगितल्या.

!doctype>
Post a Comment
0 Comments