Type Here to Get Search Results !

चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलांबाबत मंत्री मकरंद आबा पाटील व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मध्ये मुंबईत बैठक संपन्न

 चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलांबाबत मंत्री मकरंद आबा पाटील व आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मध्ये मुंबईत बैठक संपन्न

प्रलंबित बिलाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय: मंत्री मकरंद आबा पाटील


सांगोला(प्रतिनिधी):  सांगोला व मंगळवेढा येथील थकीत चारा छावणीच्या बिलाबाबत आज मंत्रालय मुंबई येथे मदत व पुनर्वसन मंत्री मा.मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील व आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी सदरच्या खात्याचे सचिव व इतर अधिकारी उपस्थित होते. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या या प्रलंबित प्रश्नांवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी लवकरच चारा छावणी प्रलंबीत अनुदान प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितल्यामुळे चारा छावणी चालकांमधून आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांची आज भेट घेऊन महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून आणि राज्य कार्यकारिणीचे समितीचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत असल्याने सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणी धारकांचे अनुदान लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी विनंती केली



गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला व मंगळवेढा येथील चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने या छावणी चालकांची खूप मोठी अर्थिक कुचुंबना होत आहे. छावणी चालकांच्या या मागणीवर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाठपुरावा व निवेदनाच्या माध्यमातून तसेच विधानसभा सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये चारा छावणी चालकांची रखडलेली बिले मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  

सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांनी चारा छावणीच्या माध्यमातुन अनेक जनावरे जगवली आहेत.तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. या चारा छावणी चालवण्यासाठी छावणी चालकांनी कर्ज काढून छावण्या चालवल्या आहेत.


२०२४ च्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मा.मकरंद आबा पाटील यांनी तो थकीत बिले देण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.काही चारा छावणी चालकाऩी सुधारीत प्रस्ताव दिलेला असुन सध्या सांगोला तालुक्यातील 20 कोटी 86 लाख 90 हजार 596 रुपये व मंगळवेढा तालुक्यातील 12 कोटी 7 लाख 50 हजार 731 रुपये एवढी बिले थकीत आहेत ती बिले ताबडतोब मिळावीत अशी मागणी लावून धरली होती.


आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांच्या या मागणीला लवकरच यश प्राप्त होणार असून प्रलंबित बिले येत्या काळात छावणी चालकांना मिळणार आहेत. 



कोट :- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सांगीतले की, सदर प्रकरणाची फाईल मा.मुख्यमंत्री महोदय यांचेकडे जाऊन संबंधित खात्याकडे आलेली असुन लवकरच या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments